अलविदा मार्क टली

आंतरराष्ट्रीय पत्रकार मार्क टली यांचं निधन झालं आणि त्या क्षणी केवळ एक ज्येष्ठ पत्रकार नाही, तर पत्रकारितेचा एक संपूर्ण काळ शांतपणे पडद्याआड गेला. ज्यांनी ही बातमी ऐकली, त्यांचे डोळे पाणावले; ज्यांनी सांगितली, त्यांचा आवाज भरून आला. कारण मार्क टली नाव ही केवळ ओळख नव्हती, तर सत्याशी निष्ठा ठेवणाऱ्या पत्रकारितेची हमी होती.

“सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।”

हा शेर मार्क टली यांच्या पत्रकारितेचं सार सांगतो. त्यांनी कधीही केवळ गदारोळ माजवण्यासाठी लेखन केलं नाही. समाजाचं वास्तव बदलण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि सामान्य माणसाचा आवाज पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लेखणी वापरली.

आजच्या काळात पत्रकार म्हणजे कॅमेऱ्यासमोर झगमगाट, सोशल मीडियावर घोषणाबाजी आणि सत्तेच्या आसपास वावरणारी व्यक्ती अशी प्रतिमा तयार झाली आहे. पण मार्क टली या सगळ्या कल्पनांपलीकडे होते. ते त्या काळातील पत्रकार होते, जे बातमीच्या मागे धावायचे; बातमी त्यांच्यामागे धावत नव्हती. २४x७ त्यांनी जग पाहिलं, अनुभवलं आणि मांडलं. पण कधीच सत्तेच्या भाषेत नाही, तर सामान्य माणसाच्या वेदनेतून.

भारत त्यांच्या आयुष्यात केवळ कामाची भूमी नव्हता. हा देश त्यांनी जाणीवपूर्वक समजून घेतला. भाषा, संस्कृती, राजकारण, धर्म, संघर्ष, आशा—भारताचे अनेक थर त्यांनी जवळून पाहिले. नव्वदी ओलांडेपर्यंत त्यांनी भारताला केवळ ओळखलं नाही, तर मनापासून प्रेम केलं. म्हणूनच ते परदेशी पत्रकार असूनही ‘आपले’ वाटले.

पण या प्रेमातही त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या. या देशात माध्यमांची घसरण त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. बातमीपेक्षा जाहिरातींना महत्त्व, प्रश्नांऐवजी स्तुती, आणि सत्याऐवजी प्रचार, ही बदलती माध्यमसंस्कृती त्यांच्या डोळ्यांसमोर आकार घेत होती. पत्रकारिता विकली जाते आहे, सत्तेचे तलवे चाटले जात आहेत, आणि प्रश्न विचारणारे आवाज मुद्दाम गुदमरवले जात आहेत. हे दृश्य एका प्रामाणिक पत्रकारासाठी असह्यच होते.

लोकशाहीची जननी म्हणून मिरवणारा देशच जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतो, पत्रकारितेच्या हक्कांना दुय्यम ठरवतो, तेव्हा लोकशाहीचं खरं रूप उघडं पडतं. मार्क टली यांनी हे सगळं पाहिलं, अनुभवलं आणि मनात खोलवर साठवून ठेवलं.

मार्क टली त्या भारतात आले नव्हते, जिथे सत्य बोलतं आणि सत्ता नम्रपणे ऐकते.
ते त्या भारतातून निघून गेले आहेत, जिथे सत्याचा आवाज प्रचाराच्या गदारोळात हरवतो आहे.

आज मार्क टली आपल्यात नाहीत. पण त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही, तर पत्रकारितेचा एक प्रामाणिक अध्याय संपला आहे. कदाचित ते आता या जगात नसतील, पण जिथे कुठे असतील तिथूनही भारतातील घसरत चाललेली पत्रकारिता पाहून त्यांची आत्मा व्यथित होत असेल आणि कदाचित प्रश्नही विचारत असेल.

अलविदा मार्क टली.
तुमची उणीव कायम जाणवत राहील.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

Recent Posts