सहानुभूतीतून मानवतेकडे नेणारा संवाद

 

 

वाचता वाचता पूज्य साने गुरुजी यांचा दि. २९ ऑगस्ट १९३८ रोजीचा “देवा गणेशा” हा लेख हाती लागला. जवळपास ८७ वर्षांपूर्वी साने गुरुजी यांनी हा लेख लिहिलेला आहे. इतका काळ लोटला पण परिस्थिती तिच असल्याचे दिसते. आजही धर्म-द्वेष, स्पृश्य -अस्पृश्य, जातीभेद, गरीब – श्रीमंत या भेदाभेदाच्या भिंती उभ्या आहेत. प्रेम, सामंजस्य, निधर्मवाद, समतावाद यापासून आपण कोसो दूर आहोत. मानव जातीने इतकी प्रगती केली पण मानवतावाद सगळीकडे अजूनही दिसून येत नाही. परस्परांतील मत्सर, द्वेष भावना काढून टाकण्यासाठी मानवाला केंद्रस्थानी ठेवून कुटुंब व समाजबांधणी करण्याची आवश्यकता आजही भासत आहे. सदानंद रेगे त्यांच्या एका कवितेत म्हणतात,

सिद्धार्थाचा
बुद्ध झाला
तेव्हा पिंपळाला
अश्वत्थपण आलं

गौतमांना जसा मानवतेच्या प्रकाशाचा साक्षात्कार झाला त्याप्रमाणे त्यातला एक तरी किरण आपल्या सर्वांच्या अंगावर पडो ही प्रार्थना गणराया पुढे करत साने गुरूजींच्या सदर लेखाचा सारांश संपादित करून आपल्या समोर विनम्रतेने सादर करतो.

या लेखात साने गुरुजी यांनी त्यांच्या हृदयमंदिरी मंगलमूर्तीचा उत्सव मांडला आहे . त्यांची बुद्धी गणेशाच्या पायाशी नम्रपणे बसली आहे. अधुनमधून जीव वर मान करून बुद्धिच्या देवतेला म्हणजेच गणेशाला प्रश्न विचारीत आहे.बुद्धिची देवता उत्तरे देत आहे. ही भक्तीप्रेमाची प्रश्नोत्तरे,गुजगोष्टी..याचा( विस्तार भयास्तव) संपादित सारांश आपल्यासाठी..

जीव:- हे गणेशा! तू सुखकर्ता , दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहेस! आमची दुःखे केव्हा जातील ,विघ्ने केव्हा हरतील आणि आम्हाला सुखाचे दिवस केव्हा येतील?
गणेश:- दुःखे दूर करण्याचा व सुख जवळ करण्याचा एकच सनातन मार्ग आहे. विघ्नांचा विनाश होणे व विकासाचा मार्ग मोकळा होणे याचाही तोच मार्ग आहे. तो मार्ग कोणता ? हे येते का तुझ्या लक्षात?
जीव:- नाही येत, गणेश देवा! तुम्हीच सांगा..
गणेश:- सहानुभूती. एकमेकांबद्दल सहानुभूती वाटणे हाच धर्माचा प्राण आहे. आज सारे सहानुभूती शून्य झाले आहेत.परस्परांबद्दल सहानुभूती वाटू लागली म्हणजे विरोध कमी होतात. द्वेषमत्सर मावळतात . सहकार्याचे राज्य सुरू होते.
जीव:- ही सहानुभूती कशाने निर्माण होईल?

गणेश:- विवेकाने. दुसऱ्याला देखील आपल्या सारखे हृदय आहे,मन आहे व बुद्धी आहे. याची जाणीव झाली म्हणजे सहानुभूती उदयास येते. आपलेपणाचे नाते सृष्टीत उत्तरोत्तर अधिक आणा. सर्व जाती, धर्मातील माणसे ईश्वराची लेकरे आहेत.ह्या लेकरांच्या हातून प्रभू आपली कार्ये करून घेतो. सर्व गणांचा मी पती,सर्व गणांचा मी ईश. खरा गणेशोत्सव करायचा असेल तर सर्व गणांना प्रेम द्या. सर्व गणांबद्दल सहानुभूती बाळगा.
जीव:- देवा गणेशा! तू सांगितलेस हे मी दुसऱ्यांना सांगेन. परंतु हे कोणाला आवडेल?
गणेश:- आवडो नावडो. स्वतःच्या सद्सदविवेक बुद्धिने वागावे. माणुसकीप्रमाणे वागावे. स्वतःच्या जिवाला त्रास झाला तरी हरकत नाही.सत्कर्म करत असताना या देहाचे मडके फुटणे याहून भाग्य ते कोणते? जा आणि या विराट गणेशाची ज्ञानमय पूजा करावयास सांग म्हणजे दुःखे दाही दिशास पळतील,विघ्ने नाहीशी होतील, समाजात आनंद व मांगल्य येईल.

संपादन : मोरेश्वर बागडे

Leave a Comment

Recent Posts