जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी

लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. मात्र याच लोकलचा प्रवास आता जीवघेणा ठरु लागला आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या रेल्वे गाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची घटना आज सकाळी घडली. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती असून यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

मुंबईत उपनगरी रेल्वेमार्गावर पाच वर्षांमध्ये 25 हजारांहून अधिक प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून एखाद्या युद्धापेक्षाही ही मनुष्यहानी मोठी आहे. या पार्श्वभूमीवर, अपुऱ्या लोकल, त्यातील जीवघेणी गर्दी, त्यावरील उपायांचा तोकडेपणा, पीडितांच्या वेदना आणि या सगळ्यांकडे रेल्वे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष समोर येते.

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर सुमारे साडेतीन हजारांहून अधिक प्रवासी दरवर्षी विविध अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. मागील पाच वर्षांमध्ये 25 हजारांहून अधिक प्रवाशांनी रेल्वे अपघातांत प्राण गमावले आहेत, तर 60 हजारांहून अधिक प्रवाशांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. रेल्वे रूळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, लोकलमध्ये चढताना आणि उतरताना हात सटकल्याने, तर काहींचा गर्दीमध्ये घुसमटूनही मृत्यू झाल्याचे प्रसंग लोकल प्रवासादरम्यान घडत आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांत एक लाखांहून अधिक प्रवाशांचे आयुष्य रेल्वे अपघातांमुळे कोलमडले आहे. एखाद्या युद्धातील मनुष्यहानीपेक्षाही ही हानी मोठी आहे. या अपघातांच्या नियंत्रणासाठी रेल्वेने केलेले उपाय कुचकामी ठरत असून मृत्यूचा हा शाप अद्याप कायम आहे.

मध्य रेल्वेवर ठाण्यापलिकडील पट्ट्याचा विचार करता, प्रवासी संख्येच्या तुलनेत गाड्यांची संख्या खूपच कमी आहे. गाड्या वाढवण्यासाठी रेल्वे रूळ अपुरे असल्याने मोजक्या गाड्यांवर प्रवाशांचा भार येतो. जलद गाड्यांमधून प्रवासाची संधी मुंब्रा आणि कळवा येथील प्रवाशांना नसल्याने या स्थानकांमध्ये सर्वाधिक गर्दी होते. सकाळच्या वेळात कर्जत-कसाऱयाहून भरून येणाऱया जलदगाड्यांमध्ये चढण्यासाठी डोंबिवलीत मोठी धक्काबुक्की होती. त्यामुळे डोंबिवली ते कोपर आणि मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गर्दीच्या वेळी गाडीतून खाली पडणाऱयांची संख्या अधिक आहे. हे पूर्णपणे गर्दीचे बळी ठरत आहेत. गर्दीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण केवळ मध्य रेल्वेच्या ठाणेपलिकडच्या पट्ट्यातच दिसते.

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. कल्याण ते कसारा आणि बदलापूरपर्यंत सुमारे 84 किमी कार्यक्षेत्र असलेले कल्याण हे एकमेव रेल्वे पोलिस ठाणे आहे. 16 स्थानके, 40 प्लॅटफॉर्म आणि सुमारे साडेआठ लाख प्रवाशांची सुरक्षा या पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे पट्ट्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू सर्वाधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघात झाल्यानंतरही जखमीपर्यंत मदत पोहचण्यात अक्षम्य दिरंगाई होते. मृतांच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदत मिळण्याऐवजी चूक कुणाची हे स्पष्टीकरण देत बसावे लागते.

गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे-दिवा परिसरात झालेल्या रेल्वे अपघातातील जखमींना मदत मिळेपर्यंत आठ ते दहा तासांहून अधिक वेळ लागल्याचे समोर आले आहे. रेल्वेकडून पुरवल्या जाणाऱया वैद्यकीय मदतीचाही प्रश्न गंभीर आहे. जखमींना रुग्णालयांपर्यंत पोहचवण्यासाठी आठ तासांहून अधिक वेळ लागल्याने प्रशासनालाही अपघाताचे गांभीर्य नसल्याचे अधोरेखित झाले आहे. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर आणि त्यापलिकडील स्थानकांमध्ये अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठीही पुरेशी वैद्यकीय व्यवस्था नाही. त्यामुळे या भागातील मंडळींना स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन, नंतर मुंबईतील सायन किंवा जेजे रुग्णालयात जावे लागते. हा विलंब जखमी प्रवाशांच्या प्राणावर बेततो.

ठाण्यापलिकडे सर्वाधिक गर्दी असल्यामुळे या भागात गर्दीमुळे गाडीतून पडून मृत्यू झाल्याचे घटना दिसतात. ठाण्यापुढे मुंबई दिशेला तसे दिसत नाहीत. कारण ठाणे हे महत्त्वाचे जिह्याचे स्थानक आहे. त्यामुळे ठाण्यापर्यंत शटल सेवा चालवणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. रेल्वे फाटक बंद करणे, संरक्षक भिंती, पादचारी पूल आदी उपायांमुळे रेल्वे रूळ ओलांडताना होणारे मृत्यू कमी झाले आहेत. परंतु गर्दीमुळे गाडीतून पडून मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या मात्र कायम आहे. त्यामुळे ठाण्यापर्यंत शटल सेवा सुरू करण्याची मागणी विविध प्रवासी संघटनांकडून कित्येक वर्षे केली जात आहे. त्याच जोडीला काही मेलमध्ये डोंबिवलीतील प्रवाशांना प्रवासाची मुभा देऊन त्या गाड्या या स्थानकात थांबवण्याची गरज आहे. अनेक मेल कल्यांणमध्ये रिकाम्या होतात, तेथून तशाच पुढे जातात. त्या डोंबिवलीला थांबल्यास लोकल प्रवासी त्यातून पुढे जाऊ शकतील, अशी सूचनाही प्रवासी महासंघांकडून केली जाते.

मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांच्या सुखरूप आणि आरामदायी प्रवासासासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यात पूल, रुळांलगत भिंत, गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचा समावेश आहे. स्वस्त आणि जलद प्रवासासाठी मुंबईत विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था म्हणून मुंबई लोकल ओळखली जाते. धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात हे दुर्देवी आहे. या अपघातांना ‘जबाबदार कोण?’ हा प्रश्न निरर्थक आहे. सर्वच यंत्रणा सारख्याच अकार्यक्षम आहे. स्थानिक पातळीवर झालेल्या नागरीकरणामुळे उद्भवलेल्या प्रश्नांना तोंड देण्यास रेल्वेची स्थानिक यंत्रणा ना सक्षम आहे, ना जबाबदार. स्थानकांमधील ओव्हरब्रीजचे रुंदीकरण असो की प्लॅटफॉर्मची उंची, लांबी वाढवायची असो की फलाटांवर छप्पर टाकायचे असो; अशा स्थानिक कामांसाठी थेट दिल्लीला मंत्र्याकडे जाण्याची वेळ येते यातच ही अकार्यक्षमता सिद्ध होते. प्रभावी नियोजनासाठी विकेंद्रित निर्णय प्रक्रिया गरजेची आहे आणि आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत नेमकी त्याचीच कमतरता आहे. आता रेल्वे प्रशासना अनेक उपाययोजना करेल. पण त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही. मूळ प्रश्न आहे तो प्रशासनातील या त्रुटींचा.

मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

Recent Posts