उच्च वैचारिक संस्कृती

अध्यात्मातल्या साहित्याचा विचार करताना प्रथम मनात विचार आला तो अध्यात्म म्हणजे काय? आणि साहित्य कशाला म्हणावे? अध्यात्म म्हणजे काय?
आत्म्याविषयीचे शास्त्र आत्मानंद ज्ञान म्हणजे अध्यात्म, प्रत्येक सजीवाच्या देहात आत्मा असतोच. तो आत्मा कधीही नष्ट होत नाही. तो अजन्मा आहे. अविनाशी आहे. देह मात्र नश्वर आहे भगवद्गीतेत आत्म्याचे वर्णन करताना गीताकारांनी म्हटलं आहे, ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि तथा इरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही।।’

ज्याप्रमाणे माणूस जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जुना (वृद्ध) देह टाकून नव्या देहाचा स्वीकार करतो. आत्म्याचं हे निर्गमन इतक्या सहजपणे होत असतं, असं गीतेमध्ये आत्म्याचं वर्णन आहे. उपमा अलंकाराच्या सहाय्याने वास्तवाचं उदाहरण सांगून आत्म्याचं गमन किती आनंदाने होत असतं हे सूचित केलं आहे. पण आपण माणसं मात्र मायेच्या आवरणात गुरफटलेले असल्याने मृत्युचं दु:ख अनावर होऊन शोक करीत राहतो. एका साध्या सोप्या टोकाच्या दारे हे किती सहजपणे पटवून दिले आहे.

आता साहित्य म्हणजे काय? याचाही आपण थोडक्यात विचार करू. काव्याची व्याख्या केली आहे. रसात्मक वाक्याला काव्य म्हणावे. ‘वाक्यं रसात्मक काव्यम्’ अशी व्याख्या आहे. ‘रमणीमार्थप्रतिपादक: शब्द: काव्यम्।’ अर्थात, रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारा शब्द म्हणजे काव्य होय.
संस्कृत कवींप्रमाणे मराठी साहित्यात न. चिं. केळकर यांनी म्हटले आहे की, ‘कल्पनाविलास आणि भावनांचा उत्कर्ष हे ज्याचे मुख्य गुण आहेत ते काव्य होय.’ श्री. कृ. कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, ‘काव्याचा आत्मा वैचित्र्य, समावृत्ती किंवा अपूर्वता आहे.’

प्राचीन काळापासून ऋषीमुनी, संतमहंतांनी वेद, उपनिषदे रामायण, महाभारतादी प्राचीन ग्रंथांमधून जीवन कसे आहे आणि ते सुखी-समाधानी शांतीपूर्ण होण्यासाठी कसे जगावे, याचा विचार ऋचा, सूक्ते, लोकसंस्कृती, सुभाषिते घालून सांगितला आहे. आधुनिक काळात त्याचेच बदललेलं रूप म्हणजे ओवी, अभंग, स्तोत्रे, आरती, भूपाळी, पोवाडा, कथा, नाटक, आत्मकथन, निबंध, विनोद आणि चारोळी वगैरे साहित्य प्रकारातून आपले नवे नवे विचार तसेच संस्कृतीची मूल्ये साहित्यिकांनी व्यक्त केली आहेत. या सगळ्याला ‘साहित्य’ असं म्हटलं जातं. म्हणजे ‘अभिधा’, लक्षणा’ आणि ‘व्यंजना’ या शब्दाच्या तीन शक्ती असतात. तर, ‘रस’ हा काव्याचा प्राण असतो. काव्यात नऊ रसांचे दर्शन होत असते. काव्यगुण काव्याचे सौंदर्य वाढवितात. विविध प्रकारचे असे दहा काव्यगुण आहेत. अनुप्रास, शब्दविकार, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अतिशयोक्ती, अर्थालंकार यामुळे काव्याला आणि एकूणच साहित्याला वेगळेपण येते.

खरं म्हणजे भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथानंतर साहित्याचा उदय झाला. तरीही भारत देशातले पहिला काव्यग्रंथ ‘संस्कृत वेद’ हाच ग्रंथ होय.
वेदांमध्ये विशेषत पंचमहाभूतांना देवता मानले आहे. त्यांच्यावर स्तुतीपर काव्य लिहिले गेले आहे. वेद, उपनिषदे, धार्मिक ग्रंथ, पुराणकथा, महाकाव्य इत्यादीतून आपल्या श्रीमंत विचारांच्या संस्कृतीचं दर्शन होते. आपले प्राचीन वाङ्मय असे वैविध्यपूर्ण आहे. त्यात जगण्याचे सार आहेच, शिकवणूकही आहे, मार्गदर्शनही आहे, उत्तम विचारांचे देणे आहे, सद्विचार आहेत, विवेकपूर्ण वागण्याचे ज्ञान आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘सन्मार्गाने धन मिळवा आणि खर्च करतांनाही विचारपूर्वक विवेकाने खर्च करा.’ तर ज्येष्ठ कवी विंदा करंदीकरांनी म्हटले आहे-
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे…
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे!’
कवीने अनुप्रास अलंकाराचा वापर करत दातृत्वशक्तीचा गौरव केला आहे.

आपल्या साहित्यिकांनी प्राचीन काळापासून आपल्याला अध्यात्माची गहनता शिकवली. त्यांनी सहजपणे आपल्या लेखनातून ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार घडवला. दैवी संपत्तीत वाढआणि असुरी संपत्तीचे दमन तसेच सद्गुणांची वाढआणि दुर्गुणांचे दमन वगैरेंचे देणे दिले आहे. सर्वसामान्यांना या अध्यात्म साहित्यातून बोध मिळत गेला, तसेच आजही नव्या पिढीला हे विचार पटताहेत, हे विशेष. अध्यात्मातल्या साहित्याची आणि त्यातील विचारांची अधिक व्यापक प्रमाणात चर्चा व्हायला हवी!

– प्रा. मेधा सोमण

 

 

Leave a Comment

Recent Posts