घोडबंदर रोडवरील विविध कामांची पालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे  : मागील आठवडाभर घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज पूर्वद्रुतगती महामार्गावरील माजिवडा जंक्शन ते कापूरबावडी जंक्शनपर्यत विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे देखील दुरूस्त करण्याचे आदेश देत असतानाच सर्व प्राधिकरणाने समन्वयाने कामे करावीत असेही सूचित केले.

यावेळी आयुक्तांनी ज्युपिटर हॉस्पिटल, माजिवडा नाका, कापूरबावडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. विविध ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिगेटींग केलेले असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या कामामध्ये बाधा न आणता वाहतूक कोंडी कशाप्रकारे सोडविता येईल या दृष्टीकोनातून नियोजन करावे. कापूरबावडी जंक्शनवर पेपर प्रॉडक्टस कंपनीलगत असलेल्या पुलावर गर्डर उभारण्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, हे काम युद्धपातळीवर पुर्ण करुन सदरचा पूल वाहतूकीसाठी खुला करावा अशीही सूचना आयुक्तांनी यावेळी दिली.

तसेच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडणारे खड्डे तातडीने बुजविता यावेत यासाठी महापालिकेकडून आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्यात आले असून त्यांच्यामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते हे कोणत्या प्राधिकरणाच्या अखत्यारित येतात हे न पाहता ज्या रस्‌त्यावर खड्डे पडले आहेत ते तातडीने बुजविण्यात येतील. पावसाळा दरम्यान करावयाच्या कामांबाबत सर्व प्राधिकरण समन्वयाने काम करुन नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Recent Posts