
महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षांत अस्थिरता, सत्तांतर आणि प्रयोगांच्या वावटळीत सापडले असतानाच विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश लक्षवेधी ठरते. या सर्व निवडणुकांच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व ठामपणे उभे राहते. विरोधकांची संख्या, टीकेचा मारा आणि राजकीय गुंतागुंत असूनही भाजपला मिळालेले यश हे फडणवीस यांच्या रणनीतीचे, संघटनकौशल्याचे आणि सातत्यपूर्ण राजकीय भूमिकेचे द्योतक आहे. निवडणुकांच्या या रणक्षेत्रात देवेंद्र फडणवीस हे `रणवीर’ ठरले आहेत.
2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारण अनपेक्षित वळणांनी भरलेले राहिले. सत्तेबाहेर असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी `विरोधी पक्षनेता’ म्हणून स्वतला केवळ टीकाकारापुरते मर्यादित ठेवले नाही. सरकारच्या निर्णयांवर आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करताना त्यांनी संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि निवडणूक यंत्रणेची तयारी सातत्याने सुरू ठेवली. `मी पुन्हा येईन’ ही घोषणा सार्थ ठरवत ते पुन्हा सत्तेत आली. त्यांच्या सत्तेत परतण्यामुळेच आज महापालिका ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पाया अधिक मजबूत होताना दिसत आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपने शहरी मतदारांवर आपली पकड कायम ठेवली. पायाभूत सुविधा, विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक यांसारख्या मुद्यांवर भाजपने मांडलेली विकासाची भाषा शहरी मतदारांना भावली. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपला मिळालेले यश हे ग्रामीण भागात पक्षाने केलेल्या विस्ताराचे प्रतीक आहे. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱया अनेक ग्रामीण भागांत भाजपने ठोस प्रवेश केला, हे फडणवीस यांच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे यश मानावे लागेल.
देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वशैली ही आक्रमक पण संघटित अशी आहे. निर्णयक्षमता, स्पष्ट भूमिका आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद ही त्यांची मोठी ताकद आहे. निवडणुकांच्या काळात त्यांनी बूथस्तरावर लक्ष केंद्रीत केले. कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे, स्थानिक मुद्यांना महत्त्व देणे आणि विरोधकांच्या कमकुवत मुद्यांवर नेमकी बोट ठेवणे, या त्रिसूत्रीमुळे भाजपला व्यापक यश मिळाले.
याशिवाय, राष्ट्रीय नेतृत्वाशी असलेला समन्वयही फडणवीस यांच्या यशात महत्त्वाचा ठरतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वाच्या धोरणांशी सुसंगत स्थानिक राजकारण उभे करताना त्यांनी महाराष्ट्राचा स्वतंत्र राजकीय स्वभावही जपला. त्यामुळे `दिल्लीचा आदेश’ आणि `महाराष्ट्राची अस्मिता’ यांचा समतोल राखण्यात ते यशस्वी ठरले.
मतदार अजूनही संघटित, स्पष्ट आणि विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्यास तयार असल्याचा स्पष्ट संदेश या निवडणूक यशातून मिळतो. मात्र हे यश कायम राखणे हे फडणवीस आणि भाजपसमोरील मोठे आव्हान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळाल्यानंतर अपेक्षांची पूर्तता, पारदर्शक कारभार आणि जनतेशी सातत्याने संवाद राखणे, यावरच भविष्यातील राजकीय वाटचाल अवलंबून राहील.
एकूणच, विधानसभा ते जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत भाजपला मिळालेले यश हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची राजकीय कसोटी ठरते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतला केवळ नेता नव्हे, तर दीर्घकालीन रणनीतीकार म्हणून सिद्ध केले आहे. पुढील काळात हे नेतृत्व राज्याच्या राजकीय स्थैर्यास आणि विकासाला कोणत्या दिशेने घेऊन जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ


