

मुंबईच्या गजबजाटापासून थोडे दूर असलेल्या नवी मुंबईतील पनवेलमध्ये आज एक वेगळीच, पण अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ आकार घेत आहे. ही क्रांती ना मोर्च्यांची आहे, ना घोषणांची; ही आहे पुस्तकांची, वाचनाची आणि तरुणांच्या बदलत्या दृष्टिकोनाची. डिजिटल युगात तरुण पिढी पुस्तकांपासून दूर जात असल्याची सार्वत्रिक तक्रार असताना, पनवेलमधील काही तरुणांनी हा गैरसमज शांतपणे खोडून काढला आहे.
‘पेजेस ऑफ पनवेल’ नावाचा हा उपक्रम केवळ एक वाचनगट नाही, तर तो विचारांची देवाणघेवाण करणारा, संवाद घडवणारा आणि पुस्तकांशी नवे नाते जोडणारा एक सजीव समुदाय आहे. पनवेलची रहिवासी अनुष्का या उपक्रमामागील प्रेरणादायी चेहरा आहे. तिच्या नेतृत्वाखाली हा समुदाय वाचनाची पारंपरिक चौकट मोडून काढतो. इथे ग्रंथालयाच्या चार भिंती नाहीत, ना शांततेच्या पाट्या. इथे आहे खुलं आकाश, हिरवळ, सकाळची शांत वेळ आणि पुस्तकांच्या पानांत हरवलेली तरुणाई.
दर रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत तरुण-तरुणी उद्यानात किंवा मोकळ्या जागेत एकत्र येतात. मोबाईल, सोशल मीडियाचा गोंगाट बाजूला ठेवून दोन तास पुस्तकांसोबत घालवण्याचा हा प्रयोग आज अनेकांना आकर्षित करत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. विविध वाचकांनी दान केलेल्या ४० ते ५० पुस्तकांचा सामायिक संग्रह ही या समुदायाची ताकद आहे. एक मोठी बॅग, त्यात विविध विषयांवरील पुस्तके, आणि वाचण्याची मुक्त संधी ही साधी पण प्रभावी संकल्पना अनेकांना वाचनाकडे परत आणत आहे.
या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य वाचनापुरते मर्यादित नाही. प्रत्येक सत्राच्या शेवटी होणारी चर्चा ही त्याची आत्मा आहे. वाचलेले पुस्तक, लेखक, विचार, अनुभव यावर मुक्त संवाद घडतो. या चर्चांमधून एका सत्रातच दहा-बारा नवीन पुस्तकांची ओळख होते. त्यामुळे केवळ ज्ञानाची भर पडत नाही, तर विचारांची कक्षा रुंदावते. ऐकण्याची, मांडणी करण्याची आणि भिन्न मतांचा सन्मान करण्याची संस्कृती येथे नकळत रुजते.
महत्त्वाची बाब म्हणजे या समुदायात असेही अनेक तरुण आहेत ज्यांनी यापूर्वी कधीच नियमित वाचन केले नव्हते. काही आठवड्यांतच ते पुस्तकप्रेमी बनतात, हीच या उपक्रमाची सर्वात मोठी उपलब्धी आहे. वाचन म्हणजे परीक्षा, अभ्यास किंवा बंधन नाही, तर तो आनंद, संवाद आणि स्वतःशी जोडणारा अनुभव आहे, हे ‘पेजेस ऑफ पनवेल’ ठामपणे दाखवून देतो.
आजच्या धावपळीच्या, तणावग्रस्त आणि तुटलेल्या सामाजिक आयुष्यात अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या ओळखी क्षणिक असतात; पण पुस्तकांभोवती जमलेला समुदाय नाती घट्ट करतो. नवीन लोक भेटतात, विचार जुळतात आणि एक सकारात्मक सामाजिक अवकाश तयार होतो. सोशल मीडियावरील फॉर्मद्वारे सहज सामील होता येणारी ही चळवळ तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे, यामागे तिची साधेपणा आणि प्रामाणिकपणा आहे.
पनवेलमधील ही शांत पुस्तकक्रांती केवळ एका शहरापुरती मर्यादित राहू नये. वाचन संस्कृती जपायची असेल, तर अशा लोककेंद्रित, खुल्या आणि समावेशक उपक्रमांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. मोठ्या आवाजाशिवाय, प्रसिद्धीच्या झगमगाटाशिवाय, केवळ पुस्तकांच्या पानांतून घडणारी ही क्रांती खरोखरच आशादायी आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ


