आव्हाडांना शह देण्यासाठी ‘दादा’ गट सक्रिय; ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांना घेतले पक्षात

ठाणे : मुंब्रा भागातील काँग्रेसचे नेते नईम खान यांनी १९९२ मध्ये ठाण्याचे महापौर पद भुषविले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे ठाणे काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी खान यांना गळा लावत त्यांचा पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी हा पक्षप्रवेश झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खान यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. असे असले तरी नईम खान यांचा मुलगा मिराज खान हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असून तो शरद पवार गटासोबत असल्याचे चित्र आहे.
 
पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख होती. तसेच राष्ट्रवादीच्या निवडुण आलेल्या ३४ पैकी २६ नगरसेवक कळवा-मुंब्रा भागातील होते. या भागाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे करतात. हा मतदार संघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अगामी विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्याविरोधात निवडणुक लढण्याची तयारी अजित पवार गटाकडून सुरू असून त्यासाठीच या गटाने मुंब्य्रात पक्षप्रवेशांची मालिका सुरू केल्याची चर्चा आहे.

Leave a Comment

Recent Posts